चंद्रपूर रोडवर वलनी गावाजवळ ट्रकच्या धडकेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यु
सुरेश कन्नमवार – मुख्य संपादक
मुल : चंद्रपूर रोडवरील वलनी फाट्याजवळ सोमवारी सकाळी 6:30 वा.च्या सुमारास ट्रक आणि स्विफ्ट कारची भीषण धडक होऊन महिला पोलीस कर्मचारी विशाखा बन्सोड यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेने मूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा बन्सोड या स्वतःच्या स्विफ्ट कार क्रमांक म्हणजे.34 BR 2568 ने चंद्रपूर येथे उजळणी कोर्सच्या प्रशिक्षणासाठी जात होत्या.
वलनी फाट्याजवळ त्यांच्या कारला ट्रकची धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशाखा बन्सोड यांची यापूर्वी सावली पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. नुकतीच त्यांची तळोधी (बाळापूर) येथे बदली झाली होती. प्रशिक्षणासाठी चंद्रपूरकडे जात असताना हा अपघात झाला. मूल शहरातील तेली मोहल्ला परिसरात रविकांत चिंतावार यांच्या घरी त्या पतीसोबत भाड्याने राहत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली.
वॉर्डातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार,विशाखा बन्सोड या अत्यंत मनमिळाऊ, हसतमुख आणि सहकार्याची भावना असलेल्या कर्मचारी म्हणून परिचित होत्या. परिसरातील नागरिकांशी त्या आपुलकीच्या नात्याने राहत होते आणि त्या नेहमी नागरिकांना सहकार्य करीत असत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना घडली असून अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
error: Content is protected !!