Friday, August 14, 2026
Home Breaking News नागझिरा वन्यजीव अभयारण्यात कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या भीषण हल्ल्यात वनरक्षक तथा माजी...

नागझिरा वन्यजीव अभयारण्यात कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या भीषण हल्ल्यात वनरक्षक तथा माजी सैनिक रामू (शामू) शरणागत यांचा दुर्दैवी मृत्यू. 📍वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

0
18

नागझिरा वन्यजीव अभयारण्यात कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या भीषण हल्ल्यात वनरक्षक तथा माजी सैनिक रामू (शामू) शरणागत यांचा दुर्दैवी मृत्यू.

📍वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

सुकदर्शन वृतांत 
गोंदिया : न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यात कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या भीषण हल्ल्यात वनरक्षक तथा माजी सैनिक रामू (शामू) शरणागत वय,४२ वर्ष रा.तिरोडा जिल्हा. गोंदिया यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी घडली.
या घटनेने वनविभागासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.वन विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार,शरणागत हे न्यू नागझिरा अभयारण्यातील उमरझरी प्रवेशद्वार परिसरात नियमित कर्तव्यावर होते.
सायंकाळच्या सुमारास जंगलातून अचानक बाहेर आलेल्या एका अस्वलाने त्यांच्यावर अनपेक्षितपणे झडप घातली.हल्ला इतका तीव्र होता की,त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.अस्वलाने बराच वेळ त्यांच्यावर हल्ला सुरूच ठेवल्याने गंभीर जखमी झालेल्या शरणागत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, बचाव पथक आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून,घटनेची नोंद घेऊन पुढील कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी भगत यांनी या घटनेला दुजोरा देत,अस्वलाच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या हल्ल्यामुळे शरणागत यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले.ही घटना केवळ एका वनकर्मचाऱ्याचा मृत्यू नसून, वनसंरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोरील वास्तवाचे विदारक चित्र आहे.
अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर,मानवी हालचाली आणि अपुरी सुरक्षा साधने यांचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता या निमित्ताने पुन्हा प्रकर्षाने समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!