Friday, August 14, 2026
Home Gadchiroli मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला,गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस..!

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला,गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस..!

0
24

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला,गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस..!

सुकदर्शन वृतांत 
भामरागड : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेला कोठी – कोरणार पूल अवघ्या तीन वर्षांतच पुरामुळे खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून उभारलेला पूल इतक्या कमी कालावधीत निकामी झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून,दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.

गुणवत्तानियंत्रण,कंत्राटी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह : – 

१५ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. विकासाचे प्रतीक म्हणून सादर करण्यात आलेला हा पूल अवघ्या तीन वर्षांतच खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्तानियंत्रण, तांत्रिक देखरेख आणि कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दक्षिण गडचिरोलीत हजारो कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अनेक रस्ते आणि पूल अल्पावधीतच उखडणे, रस्त्यांना खड्डे किंवा तडे जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना ही दुर्घटना म्हणजे त्या आरोपांवर शिक्कामोर्तब मानली जात आहे.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अमोल मारकवार आणि आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष राज बनसोड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठवून या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता बळवंत रामटेके आणि जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्र्याचे जिल्ह्यात लक्ष नसल्यामुळे अधिकारी भ्रष्टाचार करण्यासाठी मोकाट सुटल्याचा आरोपही ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.
प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न : – 
याहून धक्कादायक बाब म्हणजे, पूल खचून चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकृत तांत्रिक अहवाल, चौकशी किंवा जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. उलट संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला पूल कोसळल्याने विभागाकडून कमालीची गुप्तता पाळली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून आलेल्या झाडांमुळे पूल खचल्याचा दावा केला जात आहे.राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचारावर लगाम बसत नसल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.

कठोर कारवाई करणार : – 

अल्पावधीतच पूल खचल्याची घटना गंभीर आहे. संबंधित प्रकरणाची तत्काळ तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे.चौकशी अहवालामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!