Thursday, July 30, 2026
Home Breaking News भात रोवणीच्या हंगामासाठी मजुर कामासाठी तेलंगणात जात असतांना भीषण अपघात 📍चंद्रपूर जिल्ह्यातील...

भात रोवणीच्या हंगामासाठी मजुर कामासाठी तेलंगणात जात असतांना भीषण अपघात 📍चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार (चक) गावातील चार जणांचा मृत्यू ,27 मजूर गंभीर

0
25

भात रोवणीच्या हंगामासाठी मजुर कामासाठी तेलंगणात जात असतांना भीषण अपघात

📍चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार (चक) गावातील चार जणांचा मृत्यू ,27 मजूर गंभीर

सुकदर्शन वृतांत 
सिंदेवाही : दोन वेळच्या अन्नासाठी,कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून शेकडो किलोमीटर दूर तेलंगणात गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांवर नियतीने क्रूर घाला घातला. सिंदेवाही तालुक्यातील पवनपार (चक) गावातील मजुरांच्या वाहनाला तेलंगणातील रामगुंडम येथे झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला,तर 27 मजूर गंभीर जखमी झाले. 
या दुर्घटनेमुळे पवनपार (चक)गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.सिंदेवाही तालुक्यातील पवनपार (चक) गावातील हे सर्व मजूर दरवर्षी प्रमाणे यंदाही भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. गुरुवारी सायंकाळी 6:30 वा.च्या सुमारास दिवसभराची कष्टाची मजुरी आटोपून ते आपल्या निवासस्थानी परतत असताना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. 
अपघाताचा जोर इतका जबरदस्त होता की घटनास्थळीच 4 मजुरांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले.या दुर्घटनेत 
1) अतुल वासुदेव सोनुले वय,45 वर्ष 2) अर्चना जनार्धन सोनुले वय,40 वर्ष 3) प्रभा सिताराम मोहुर्ले वय,56 वर्ष 4) रंजना प्रभाकर शेंडे वय, 50 वर्ष 
यांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याने गावातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जखमी 27 मजुरांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह हंगामी शेतीमजुरीवर अवलंबून आहे. धान रोवणीच्या हंगामात दरवर्षी शेकडो मजूर तेलंगणातील विविध भागांत कामासाठी जातात. मात्र, यंदा रोजगाराच्या शोधात गेलेल्या या मजुरांचा प्रवास काळाने कायमचा थांबविला.
दुर्घटनेची बातमी गावात पोहोचताच मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अनेकांच्या घरातील कर्ते सदस्य या अपघातात मृत्युमुखी पडल्याने कुटुंबांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. गावात शोकमय वातावरण असून, मृतांच्या घरांसमोर सांत्वनासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तेलंगणा पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मृतांचे पार्थिव चंद्रपूर जिल्ह्यात आणण्यासाठी आणि जखमींना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
ही दुर्घटना पुन्हा एकदा ग्रामीण भागातील हंगामी स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली असून, कामासाठी परराज्यात जाणाऱ्या मजुरांच्या वाहतूक आणि सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!