Home Breaking News गडचिरोली तालुक्यातील मेंढा – चांदाळा मार्गावर मेंढा येथील 38 वर्षीय युवकाला हत्तीने...
गडचिरोली तालुक्यातील मेंढा – चांदाळा मार्गावर मेंढा येथील 38 वर्षीय युवकाला हत्तीने सोंडेने उचलून जमिनीवर आपटत पायाखाली चिरडून केले ठार.
सुरेश कन्नमवार – मुख्य संपादक (सुकदर्शन वृतांत)
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर गडचिरोलीत दाखल झालेल्या रानटी ” टस्कर ” हत्तीने पुन्हा एक बळी घेतला आहे.गडचिरोली तालुक्यातील मेंढा – चांदाळा मार्गावर बुधवारी सायंकाळी सायकलने घरी परतणाऱ्या 38 वर्षीय शेतकरी-विटभट्टी कामगाराला हत्तीने सोंडेने उचलून जमिनीवर आपटत पायाखाली चिरडून ठार केले.
वनविभागाने यापूर्वीच या परिसरात हत्तीच्या हालचालींबाबत जनजागृती करून इशारा दिला असतानाही ही घटना घडल्याने वन्यजीव – मानव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धनराज मनिराम मडावी वय,38 रा.मेंढाअसे मृताचे नाव आहे.विटभट्टीवर काम करण्याबरोबरच शेतीही करत होते.बुधवारी काही सहकाऱ्यांसह ते कामानिमित्त सायकलने चांदाळा येथे गेले होते. सायंकाळी 6:30 वा.च्या सुमारास काम आटोपून सर्वजण मेंढ्याकडे परतत असताना मेंढा टोली गावापासून सुमारे 300 मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला अचानक भरकटलेला टस्कर हत्ती समोर आला.
हत्तीचे दर्शन होताच सर्वांनी भीतीपोटी सायकली टाकून जीव वाचविण्यासाठी धाव घेतली.धनराज मडावी यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.हत्तीने त्यांचा पाठलाग करून सोंडेने उचलले,जोरात जमिनीवर आपटले आणि त्यानंतर पायाखाली तुडवत जागीच ठार केले. सहकाऱ्यांनी दूरून हा थरार पाहिला. हत्तीच्या भीतीने कोणालाही मदतीसाठी पुढे जाता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर, क्षेत्रसहायक प्रदीप गेडाम यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मडावी यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या निधनामुळे मेंढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वनविभागाने बुधवारी सकाळीच चांदाळा परिसरात भरकटलेला टस्कर तसेच हत्तींच्या कळपाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती देत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले होते.अत्यावश्यक कारणाशिवाय जंगलालगतच्या रस्त्यांवर जाणे टाळावे,असेही सांगण्यात आले होते.
तरीही ही दुर्घटना घडल्याने जनजागृतीबरोबरच अशा भागात अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.टस्कर हत्तीने 2 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूर परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या अतुल गोहणे वय,52 वर्ष यांना चिरडून ठार केले होते. त्यानंतर हा हत्ती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला.
अवघ्या आठ दिवसांच्या अंतराने दुसरा बळी गेल्याने वनविभागासमोरील आव्हान अधिक गंभीर बनले असून, भरकटलेल्या या टस्करचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
error: Content is protected !!