Saturday, August 1, 2026
Home Breaking News चिमुर तालुक्यातील बरडघाट येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.

चिमुर तालुक्यातील बरडघाट येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.

0
24

चिमुर तालुक्यातील बरडघाट येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.

सुकदर्शन वृतांत 
चिमुर : चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर झोनमधील बरडघाट परिसरात वाघाने शेतमजुराचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. कुंपण उभारणीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी जंगलालगत गेलेल्या राजेंद्र तिमाजी भोयर वय,50 वर्ष रा.नवेगाव या शेतमजुरावर वाघाने अचानक हल्ला करून जागीच ठार झाले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून,नागरिकांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विश्वनाथ भोयर हे आपल्या शेताला कुंपण घालण्यासाठी साहित्य आणायला गेले होते.त्यांच्यासोबत राजेंद्र भोयर हे शेतमजूरही होते.
शेती परिसरात काम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने राजेंद्र भोयर यांच्यावर अचानक झडप घातली.हा हल्ला इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाघाने मृतदेह ओढत कंपार्टमेंट क्रमांक,55 मधून 54 मध्ये नेल्याची माहिती समोर आली आहे.
या थरारक घटनेच्या वेळी सोबत असलेले विश्वनाथ भोयर यांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला आणि थेट गावात जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
सध्या पुढील तपास सुरू असून, वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी आणि मजुरांनी शेतात जाणे बंद केले आहे.या नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!