Home Chandrapur चंद्रपूर,गडचिरोलीला आज ” यलो अलर्ट ” विदर्भावर पुन्हा पावसाचे संकट,चार दिवस वादळी...
चंद्रपूर,गडचिरोलीला आज ” यलो अलर्ट ” विदर्भावर पुन्हा पावसाचे संकट,चार दिवस वादळी पावसाचा इशारा
सुकदर्शन वृतांत
नागपूर : विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.११ ते १४ सप्टेंबरदरम्यान पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः आज, ११ सप्टेंबरला चंद्रपूर आणि गडचिरोलीला मुसळधार पावसासह ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र : –
बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, त्याच्या प्रभावामुळे विदर्भातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. ११ सप्टेंबरला चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. भंडारा आणि गोंदिया येथे विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.
१२ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात वादळी वातावरण : –
१२ सप्टेंबरला पावसाचा प्रभाव आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसासह मेघगर्जना, वीज आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
१३ सप्टेंबरला अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. १४ सप्टेंबरपर्यंत पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून राज्यातील इतर भागांतही वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तापमानातही घट होणार : –
सध्या विदर्भातील कमाल तापमान ३१ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. पुढील २४ तासांत तापमानात मोठा बदल अपेक्षित नसला तरी त्यानंतर दोन ते चार दिवसांत कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
१० सप्टेंबरच्या सकाळ पर्यंतच्या २४ तासांत चिमूर येथे ४.८ मिमी पावसाची नोंद झाली. चंद्रपूर येथे विदर्भातील सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमान, तर यवतमाळ येथे १७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन : –
मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, रस्ते व भुयारी मार्गांमध्ये पाणी भरणे, वाहतुकीचा खोळंबा तसेच कच्च्या रस्त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही भागांत शेती आणि बागायती पिकांचे नुकसान होऊ शकते.
नागरिकांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे, वादळी वातावरणात झाडे, विजेचे खांब किंवा धोकादायक संरचनांखाली थांबू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!