Friday, August 14, 2026
Home Education जपतलाई सर्पदंश दुर्घटना : दोन विद्यार्थिनी कविता किरंगे व दीपिका मडावी यांना...

जपतलाई सर्पदंश दुर्घटना : दोन विद्यार्थिनी कविता किरंगे व दीपिका मडावी यांना रुग्णालयातून सुटी 📍उपचाराधीनसमृद्धी नैताम च्या प्रकृतीतही सुधारणा –  आदिवासी अपर आयुक्त आयुषी सिंह यांची माहिती

0
4

जपतलाई सर्पदंश दुर्घटना : दोन विद्यार्थिनी कविता किरंगे व दीपिका मडावी यांना रुग्णालयातून सुटी

📍उपचाराधीन समृद्धी नैताम च्या प्रकृतीतही सुधारणा –  आदिवासी अपर आयुक्त आयुषी सिंह यांची माहिती

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थिनींपैकी कविता किरंगे आणि दीपिका मडावी या दोघींना प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर गडचिरोली येथे उपचार सुरू असलेली समृद्धी सुरेश नैताम ही बोलण्याला प्रतिसाद देत असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी दिली.
जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी कविता किरंगे हिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आज, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने तिला तिच्या मेढरी, ता. एटापल्ली येथील निवासस्थानी सुरक्षितपणे पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या घटनेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी दीपिका मडावी, रा. केकावाही, ता. धानोरा हिला पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिलाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दीपिकाला प्रशासनाच्या व्यवस्थेतून नागपूरहून रुग्णवाहिकेद्वारे तिच्या गावी पोहोचविण्यात येत आहे.
 इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी सुरेश नैताम हिच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून ती बोलण्याला प्रतिसाद देत आहे. तिच्यावर आवश्यक उपचार सुरू असल्याचे अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी कळविले आहे.
जपतलई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर बाधित विद्यार्थिनींच्या उपचारांवर आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. रुग्णालयातून सुटी मिळालेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचविण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली असून उपचाराधीन विद्यार्थिनीच्या प्रकृतीचाही नियमित आढावा घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!