Thursday, July 30, 2026
Home Breaking News जुनोना वनपरिक्षेत्रातील सातारा (भोसले) येथे वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा जागीच मृत्यू ; दुसऱ्या...

जुनोना वनपरिक्षेत्रातील सातारा (भोसले) येथे वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा जागीच मृत्यू ; दुसऱ्या गुराख्याचा जीव थोडक्यात बचावला.

0
16

जुनोना वनपरिक्षेत्रातील सातारा (भोसले) येथे वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा जागीच मृत्यू ; दुसऱ्या गुराख्याचा जीव थोडक्यात बचावला.

सुकदर्शन वृतांत 
चंद्रपूर : जुनोना वनपरिक्षेत्रातील सातारा भोसले गावालगतच्या जंगलात गुरुवारी दुपारी घडलेल्या वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा जागीच मृत्यू झाला. उसटू लहानूजी पोरेते वय,50 वर्ष असे मृत गुराख्याचे नाव असून, या घटनेमुळे सातारा (भोसले) सह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रसंगावधान राखून झाडावर चढल्याने त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या गुराख्याचा जीव थोडक्यात बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, उसटू पोरेते आणि नीलकंठ रामभाऊ पेंदोर हे गुरुवारी नेहमीप्रमाणे गावातील जनावरे चारण्यासाठी सातारा भोसले गावालगतच्या जंगलातील वन विभागाच्या कंम्पार्टमेंट क्रमांक,441 मध्ये गेले होते. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक पट्टेदार वाघ समोर आला. वाघ दिसताच दोघांनी जीवाच्या आकांताने धाव घेण्याचा प्रयत्न केला.नीलकंठ पेंदोर यांनी प्रसंगावधान राखत जवळील झाडावर चढून स्वतःचा जीव वाचविला.
दुसरीकडे,उसटू पोरेते यांच्यावर वाघाने झडप घालत भीषण हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विकास महामंडळाचे प्रकल्प सहायक व्यवस्थापक आर.एस.कदम,जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एन.मेश्राम तसेच सातारा (भोसले) बीटाचे वनरक्षक कावरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. )आवश्यक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृत उसटू पोरेते यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.कुटुंबाचा प्रमुख आधार हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. वन विकास महामंडळाकडून अंत्यसंस्कारासाठी तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना देण्यात आला.
घटनेनंतर संबंधित परिसरात वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प सहायक व्यवस्थापक आर.एस.कदम यांनी दिली. तसेच नागरिकांनी जंगल परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी,असे आवाहन वन विभागाने केले आहे.
या घटनेनंतर सातारा भोसले आणि जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः जनावरे चारण्यासाठी जंगलात जाणाऱ्या गुराख्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून,वन विभागाने वाघाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मानवी वस्तीजवळ वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि त्यातून घडणाऱ्या घटनांमुळे जंगलालगतच्या गावांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृती आणि सतर्कता वाढविण्याची गरजही या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!