Home Breaking News चंद्रपुर जिल्ह्यात बालकांच्या पोषण स्थितीचा धक्कादायक अहवाल ; 1,749 बालके कुपोषणाच्या विळख्यात...
चंद्रपुर जिल्ह्यात बालकांच्या पोषण स्थितीचा धक्कादायक अहवाल ; 1,749 बालके कुपोषणाच्या विळख्यात
📍भद्रावती,ब्रह्मपुरी आणि चिमूरमध्ये प्रत्येकी १८० मध्यम तीव्र कुपोषित बालके,वरोरा येथे सर्वाधिक ३० अतितीव्र कुपोषित बालके
सुकदर्शन वृतांत
चंद्रपूर : जिल्ह्यातील पाच वर्षांखालील बालकांच्या पोषणस्थितीचे जुलै २०२६ अखेरचे चित्र समोर आले आहे. १ हजार ७४९ बालके मध्यम तीव्र आणि अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये १ हजार ५५८ बालके मध्यम तीव्र कुपोषित, तर १९१ बालके अतितीव्र कुपोषित आहेत. त्यामुळे या बालकांच्या पोषण आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ४४७ अंगणवाडी केंद्रांमधील ६० हजार ५७० बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ६० हजार ५३७ बालकांचे वजन घेण्यात आले. वजनाच्या आधारे ५१ हजार ३९९ बालके सामान्य, ७ हजार ९९२ बालके कमी वजनाची, तर १ हजार २२६ बालके अति कमी वजनाची आढळली आहेत. जिल्ह्यात वजन घेण्यात आलेल्या बालकांपैकी ८४.९१ टक्के बालके सामान्य वजनाची आहेत.
तर १३.२० टक्के बालके कमी वजनाची, २.०३ टक्के अति कमी वजनाची आहेत. उंची आणि वजनाच्या निकषांनुसार २.५७ टक्के बालके मध्यम तीव्र कुपोषित, तर ०.३२ टक्के बालके अतितीव्र कुपोषित असल्याची नोंद आहे.
नियमित निरीक्षणावर भर आवश्यक : –
पाच वर्षांखालील वय हे बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे कुपोषणाची लक्षणे वेळेत ओळखून बालकांचे नियमित वजन व उंची मोजणे, पोषण आहार देणे, आरोग्य तपासणी करणे आणि गरजेनुसार उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विशेषतः १९१ अति तीव्र कुपोषित बालकांकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
भद्रावती, ब्रह्मपुरी,चिमूरमध्ये प्रत्येकी १८० मध्यम तीव्र कुपोषित बालके : –
मध्यम तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत भद्रावती, ब्रह्मपुरी आणि चिमूर हे प्रकल्प आघाडीवर असून, तिन्ही ठिकाणी प्रत्येकी १८० बालके या श्रेणीत आहेत. त्यापाठोपाठ कोरपना १६१, भद्रावतीनंतर गोंडपिपरी ९६, राजुरा ८८, सिंदेवाही ८०, जिवती ७६, मूल ७२ आणि चंद्रपूर ६४ अशी स्थिती आहे.
अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत वरोरा प्रकल्प ३० बालकांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. भद्रावतीत २९, चिमूरमध्ये २२, ब्रह्मपुरीत १९, कोरपन्यात १५, सावलीत १२, मूलमध्ये ११, तर सिंदेवाही, नागभीड आणि गोंडपिपरीत प्रत्येकी ९ बालके अतितीव्र कुपोषित आहेत.
ब्रह्मपुरीत कमी वजनाची सर्वाधिक बालके : –
कमी वजनाच्या बालकांच्या संख्येत ब्रह्मपुरी प्रकल्पात सर्वाधिक ९२८ बालके आहेत. त्यानंतर चिमूरमध्ये ८९१.नागभीडमध्ये ७१४, मूलमध्ये ६१२, सावलीत ६०१, जिवतील ५९९, कोरपन्यात ५७६ आणि वरोन्यात ५६६ बालके कमी वजनाची आहेत,कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण विचारात घेतल्यास पोंभुर्णा प्रकल्पाची स्थिती अधिक लक्षवेधी आहे. येथे वजन घेतलेल्या १ हजार ७४८ बालकांपैकी ३१६ बालके कमी वजनाची आहेत. जिवती, कोरपना आणि गोंडपिपरी या प्रकल्पांमध्येही कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
चंद्रपूर प्रकल्पात ९२ टक्के बालके सामान्य : –
चंद्रपूर प्रकल्पात वजन घेण्यात आलेल्या ५ हजार २२९ बालकांपैकी ४ हजार ८०९ बालके सामान्य वजनाची आहेत. हे प्रमाण जवळपास ९२ टक्के आहे, बल्लारपूरमध्ये १ हजार ६८० पैकी १ हजार ५०९, सिंदेवाहीत ४ हजार ४६३ पैकी ३ हजार ९९० आणि राजुरात ४ हजार ११२ पैकी ३ हजार ५९० बालके सामान्य वजनाची आहेत.
error: Content is protected !!