Thursday, July 30, 2026
Home Breaking News भामरागड तालुक्यात आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधेचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर.   📍बंगाडी...

भामरागड तालुक्यात आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधेचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर.   📍बंगाडी गावातील एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी नेण्यासाठी ग्रामस्थांना मध्यरात्री खाटेवरून 3 कि.मी.पायपीट.

0
17

भामरागड तालुक्यात आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधेचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर.  

📍बंगाडी गावातील एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी नेण्यासाठी ग्रामस्थांना मध्यरात्री खाटेवरून 3 कि.मी.पायपीट.

सुकदर्शन वृतांत 
भामरागड : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधेचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. बंगाडी गावातील एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी नेण्यासाठी ग्रामस्थांना मध्यरात्री खाटेवरून 3 कि.मी.पायपीट करावी लागली.
त्यानंतर पुराच्या पाण्याने फुगलेल्या नाल्यावरून टिनाच्या नावेतून जीव धोक्यात घालून रुग्णाला बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य व दळणवळण व्यवस्थेच्या वास्तवावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भामरागड तालुक्यातील बंगाडी गावातील संतोष जेट्टी वय,29 वर्ष यांना रविवारी मध्यरात्री अचानक मूत्रमार्गाचा तीव्र त्रास सुरू झाला. संसर्ग वाढल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि तातडीने उपचाराची आवश्यकता निर्माण झाली.मुसळधार पावसामुळे रस्ते चिखलमय झाले होते.तर नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्याने रुग्णवाहिका थेट गावापर्यंत पोहोचू शकत नव्हती.
रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेत ग्रामस्थांनी संतोष जेट्टी यांना खाटेवर झोपवून मोबाइलच्या बॅटरी च्या उजेडात सुमारे तीन किलोमीटरचा खडतर प्रवास सुरू केला. चिखलमय वाटा आणि अंधारातून वाट काढत ते नदीकाठी पोहोचले. तेथून पुराच्या पाण्यात टिनाच्या नावेत बसवून रुग्णाला नाला ओलांडण्यात आला. त्यानंतर गुंडेनूर नाल्याजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. 
प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठविले.तेथून पुढील उपचारासाठी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली.भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो.
पूल आणि रस्त्यांचा अभाव असल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचविताना ग्रामस्थांना जीव धोक्यात घालावा लागतो.गुंडेनूर नाल्यावरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दर पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असताना संबंधित यंत्रणांनी कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
नावेतून नाला पार केल्याचा दावा फेटाळला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वीच लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती.आशा सेविकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून संबंधित रुग्णाला रुग्णवाहिकेतूनच दवाखान्यात आणण्यात आले.बंगाडी नाला पार करून रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचली होती. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. – डॉ.प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी,गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!