Home Breaking News बल्लारपूर मध्ये धक्कादायक घटना.आई आणि आठ वर्षांच्या मुलाचा एकाच दिवशी मृत्यू.
बल्लारपूर मध्ये धक्कादायक घटना.आई आणि आठ वर्षांच्या मुलाचा एकाच दिवशी मृत्यू.
सुकदर्शन वृतांत
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आई आणि तिच्या अवघ्या आठ वर्षांच्या मुलाचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे.या दुर्दैवी आणि संशयास्पद घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
केता दीपक सूर्यवंशी वय,30 वर्ष आणि वंश दीपक सूर्यवंशी वय,8 वर्ष अशी मृत आई व मुलाची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर येथील रहिवासी असलेल्या केता सूर्यवंशी या 8 जून रोजी घरात स्वयंपाक करत असताना अचानक लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजल्या होत्या.
त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तिथे डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. आई रुग्णालयात उपचार घेत असताना,8 वर्षांचा चिमुरडा वंश हा त्याचे आजोबा शीतल सूर्यवंशी यांच्या सोबत घरी राहत होता.चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी 11:00. वा.च्या सुमारास वंश अचानक घरातून बाहेर पडला आणि बेपत्ता झाला. बराच शोध घेऊनही त्याचा कुठेच पत्ता न लागल्याने आणि तो सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने हताश झालेल्या आजोबांनी पोलिसांत तो हरविल्याची तक्रार नोंदवली.
दुसऱ्या दिवशी सकाळी एका शेजाऱ्याने वंश सापडल्याची माहिती दिली.पाठोपाठ त्याचा मृतदेह सापडल्याचे सांगताच आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली.
घराच्या जवळच असलेल्या एका नाल्यामध्ये वंशचा मृतदेह तरंगताना आढळून आला. खेळता खेळता पाय घसरून नाल्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.या संपूर्ण घटनेतील सर्वात वेदनादायी आणि चक्रावून टाकणारी बाब म्हणजे, ज्या दिवशी निष्पाप वंशचा नाल्यात पडून मृत्यू झाला.
त्याच दिवशी नागपूरच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्याची आई केता सूर्यवंशी यांनीही अखेरचा श्वास घेतला. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या दोन मृत्यूंमुळे सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पोलीस या दोन्ही घटनांचा सखोल तपास करत आहेत.स्वयंपाक करताना केता यांना आग कशी लागली आणि वंश नाल्यापर्यंत कसा पोहोचला,यामागे काही घातपात तर नाही ना,या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत.
error: Content is protected !!